समाजकारण व समाजसेवा याचं बाळकडू प्यायलेले सुभाष सुरेशचंद्र देशमुख उर्फ बापू हे जिद्द, कष्ट, मेहनत याच्या जोरावर मनुष्य सर्व अडचणी पार करून आपले ध्येय नेहमीच साध्य करू शकतो याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अतिशय सर्वसामान्य घरातून परंतु कायमच संस्कारी वातावरणात वाढलेल्या बापूंनी समाजकारणाच्या भावनेतून राजकारणात प्रवेश केला. आज ते दक्षिण सोलापूर मतदार संघातून विद्यमान आमदार आहेत व सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील आहेत. मा. श्री. सुभाष सुरेशचंद्र देशमुख म्हणजे जनमानसात आपले विशेष स्थान निर्माण केलेले व्यक्तिमत्व.
सोलापूरच्या मातीमध्ये घडलेले, उद्योग - व्यवसाय, समाजकार्य व राजकारण अशा सर्वच क्षेत्रामधील यशस्वी व खंबीर नेतृत्व म्हणजे सुभाषबापू. सोलापूर विषयी एक व्हिजन घेऊन अविरत कार्यरत असणारे सुभाषबापू भाजपा सरकारच्या कार्यकाळात सहकार, मदत व पुनर्वसन खात्यांचा पदभार सांभाळत असताना महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहिले आहेत.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा. श्री. सुभाष सुरेशचंद्र देशमुख उर्फ बापू हे भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ व प्रमुख सदस्य. मृदुभाषी स्वभाव, संवाद साधण्याची कला, सर्वांना जोडून घेण्याची वृत्ती, संघटन कौशल्य, उत्तम निर्णयक्षमता या गुणांमुळे बापूंना नेहेमीच कार्यकर्ते व जनतेचा विश्वास आणि उत्तम पाठिंबा लाभला आहे.
१९९८ सालच्या जानेवारी महिन्यात सोलापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जेष्ठ नेते युन्नुसभाई शेख यांचा पराभव करून आमदार म्हणून विजय मिळविला.
२००० साली सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. बापूंच्या समर्थ नेतृत्वाला मिळणारी लोकप्रियता व मजबूत जनाधार पाहता बापूंना पक्षाकडून ही जबाबदारी देण्यात आली.
२००० साली सोलापूर तरुण भारतच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली.
२००४ साली महाराष्ट्र सहकार आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली.
२००४ साली लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व व भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी सौ. उज्वलाताई शिंदे यांचा पराभव करून लोकसभा सदस्य म्हणून विजय प्राप्त केला.
२००९ साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदार संघामधून माजी केंद्रीय कृषिमंत्री श्री. शरदचंद्र पवार यांना कठीण लढत देत मोठ्या संख्येने मते मिळविली. बापूंना मजबूत जनाधार मिळत असल्याचेच हे प्रतीक होय.
२००९ साली विधानसभेच्या निवडणुकीत उस्मानाबाद, तुळजापूर विधानसभा मतदार संघामध्ये कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजी दुग्धविकासमंत्री श्री. मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात अटीतटीची निवडणूक लढविली.
२०१४ साली भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाकडून सोपविण्यात आली.
२०१४ साली कॉंग्रेसचे विद्यमान आमदार श्री. दिलीप माने यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून विधानसभेत आमदार म्हणून विजय प्राप्त केला.
७ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग खात्यांसाठी कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
१७ जून रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विद्यमान सहकार खात्याच्या प्रभारासह, मदत व पुनर्वसन या खात्यांसाठी कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाबा मिस्त्री यांचा मोठ्या फरकाने पराभव करत विधानसभेत आमदार म्हणून विजय प्राप्त केला.
कष्ट, मेहनत यांनीच नशीब साकार होत असते यावर विश्वास ठेवून बापू अखंड कार्यरत आहेत. सोळा वर्षे कंत्राटदारीच्या कामांचा व्यवसाय व त्यानंतर बँक, पतसंस्था, मल्टीस्टेट सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध डेअरी अशा वित्तीय व औद्योगिक संस्था बापूंनी उभ्या केल्या. एवढा औद्योगिक पसारा वाढल्यानंतरही निस्वार्थी वृत्तीने बापू समाजकार्य व राजकारण यांसाठी झटत आहेत.
मोठ्या मेहनतीने उभे केलेल्या व स्थिरसावर झालेल्या या विविध उद्योग व व्यवसायांची धुरा जबाबदार व सक्षम खांद्यांवर सोपवून, कोणताही स्वार्थ न ठेवता बापूंनी आपले जीवन संपूर्णतः समाजकार्य व राजकीय कार्यासाठी वाहून घेतले आहे.
बापूंच्या सामाजिक कार्याचा आढावा शब्दांत मांडणे तसे कठीणच. समाजाचा संपूर्ण विकास साधण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा विकास झाला पाहिजे हे बापूंचे ठाम मत. शिक्षण, आरोग्य, जल संधारण, वृक्ष लागवड, ज्येष्ठ नागरिकांना आधार, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यांसारख्या अनेक कार्यांद्वारे शहरी भागाबरोबरच प्रत्येक गाव, प्रत्येक खेड्यातील सर्व घटकांचा विकास घडवून आणण्यासाठी बापू सदैव प्रयत्न करित आहेत.
ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाचा आधार. परंतु ज्या ज्येष्ठांना कौटुंबिक आधार नाही त्यांच्या वाटेला उपेक्षा येऊ नये, त्यांचे हाल, उपासमार होऊ नयेत यासाठी 'अन्नपूर्णा योजना' राबविली जाते. या अंतर्गत सुमारे ५०० वृध्द व निराधार ज्येष्ठ नागरिकांना दररोज दोन वेळा मोफत भोजन घरपोच पुरविले जाते. सोलापूरसह उस्मानाबादमध्ये ही सेवा गेली ५ वर्षे अविरतपणे सुरु आहे. त्या निराधार माता पित्यांचा आशीर्वाद बापूंना लाभत आहे. या सेवेलाही आता मोठ्या प्रमाणावर जनसहभाग प्राप्त होत असून या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच जाईल.
सोलापूर जिल्हा हिरवा व पर्यावरण समृद्ध व्हावा यासाठी बापूंचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर सर्वप्रथम येथील वृक्षतोड थांबवायास हवी तसेच अधिकाधिक झाडे लावली जाऊन त्यांचे संगोपन व संवर्धन करणेही तेवढेच महत्वाचे असते. यासाठी २०१२ या वर्षापासून पासून सोलापूर मध्ये 'वृक्ष संगोपन' योजना सुरु करण्यात आली. विविध संस्था, गृहनिर्माण सोसायटी यांना या योजनेत सहभागी करून घेण्यात आले. या योजनेत सहभागी झालेल्या सोसायटी व संस्थांना झाडे लावण्यासाठी व त्यांचे संगोपन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यांनी लावलेल्या प्रत्येक झाडामागे दर वर्षी १०० रुपये निधी देण्यात येतो. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात २ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली त्यावेळी केवळ दक्षिण सोलापूरमध्ये दोन तासात २४ हजार वृक्ष लावण्याचा विक्रम करण्यात आला.
मानवी जीवनाची सर्वात मोठी गरज म्हणजे पाणी. आज पाण्याची परिस्थिती सर्वत्र गंभीर बनत चालली आहे. एकीकडे विकासाकडे वाटचाल सुरू असताना पाण्याचा प्रश्न मात्र दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. यावर वेळीच उपाय केले नाहीत तर भविष्यात पाण्याचे मोठे संकट समाजापुढे उभे राहील. लोकसहभागातून पुढाकार घेत बापूंनी 'पाणी जिरवा' या योजने अंतर्गत अनेक कामे केली. ओढे, तलाव, बंधारे यांसारख्या जल स्रोतांमध्ये साठणार्या गाळामुळे त्यांची साठवण क्षमता कमी होते. यासाठी सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील होटगी, विंचूर, निंबर्गी अशा अनेक ठिकाणी ओढे, तलाव, बंधाऱ्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण केले गेले. या कामातून हजारो टन गाळ काढला गेला व त्यामुळे या जलस्रोतांची साठवण क्षमता अनेक पटींनी वाढून आसपासच्या भागातील पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे.
समाजाला सशक्त बनवण्यासाठी सर्व समाज घटकांचे आरोग्य उत्तम राखणे आवश्यक असते. विशेषतः ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन सातत्याने केले जाते. या योजनेअंतर्गत आजवर हजारो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. बेताची आर्थिक परिस्थिती हा उपचारांमधील अडसर ठरू नये यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट संचालित “लोकमंगल जीवक हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र” या हॉस्पिटलची स्थापना केली गेली. येथे गरजूंवर नाममात्र शुल्कामध्ये उपचार केले जातात.
विवाह सोहळा म्हणलं की खर्च वाढतो. शेतकरी, कष्टकरी समाजाची बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या मुला मुलींच्या विवाहासाठी बरीच आर्थिक ओढाताण होते. हे लक्षात घेऊन बापूंनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. या योजने अंतर्गत आजवर अडीच हजारपेक्षा जास्त मुलींचे विवाह लावून देण्यात आले आहेत. हे कार्य गेली १३ वर्षे जोमाने सुरू आहे. या योजनेमध्ये विवाह तर मोफत होतोच परंतु त्याचबरोबर या जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचे वाटपही केले जाते. याचबरोबर व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. या योजनेचा लाभही अनेक जोडप्यांना झाला आहे.
शिक्षण हा सशक्त समाजाचा पाया असतो हे ओळखून समाजातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी बापूंनी अविरत प्रयत्न केले. बापूंनी सुरू केलेल्या विद्यादान योजने अंतर्गत दरवर्षी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी समाजातील २५० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या भोजन, शिक्षण व निवासाची व्यवस्था केली जाते. मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देत राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त “बेटी बचाओ – बेटी पढाओ” या मोहिमेला प्रतिसाद म्हणून सोलापूर जिल्ह्यातील १५० मुलींच्या नावावर शुभमंगल योजनेच्या माध्यमातून २००० रुपयांची ठेवही ठेवण्यात आली आहे.
स्वार्थ आणि अहंकार यांच्या वार्यापासून दूर राहिलेला माणूस सेवावृत्तीने कसं नवरचनात्मक कार्य करू शकतो, याचं दर्शन श्री. देशमुखांच्या अनेक संस्थांपासून घडू शकते.
- स्व. डॉ. निर्मलकुमार फडकुले.
धर्मनीती आणि राजनीती दोन्ही जर एका व्यक्तीकडे असतील तर तोच आदर्श नेता बनू शकतो. बापूंच्या जीवनामध्ये दोन्ही नितींना स्वतंत्र स्थान आहे.
- ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज.
असंख्य पाकळ्यांनी जलाशयातले कमळ उमललेले असते तसे बापूंचे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. सुयोग्य नियोजन, कल्पनाशक्ती, उद्यमशीलता, सर्वांगीण विकासाचा ध्यास आणि याहीपेक्षा स्वकोषातून बाहेर येऊन कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व आहे.
- कविवर्य दत्ता हलसगीकर.
श्री. सुभाष देशमुख एक अजब रसायन आहे. परिसाचे दुसरे रूप म्हणावे असे कर्तृत्व आहे. लोकमान्यता आहे. आपल्या प्रत्येक यशात सर्वांना वाटेकरी करून घेणार्या सुभाषबापूंसारखे नेते आता विरळच झाले आहेत.
- ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर.
बापूंच्या लोकमंगल यज्ञात सर्वांनी सहभागी व्हावे व त्यांच्या विचारांच्या निखार्यांना हजारो हातांनी श्रमाचे तूप घालावे. आपण सर्वांनी बापूंच्या कर्तृत्वाला साथ द्यावी व सोलापूर मंगलमय करावे.
- प्रा. ए. डी. जोशी, इंडियन मॉडेल स्कूल.
बापूंचे मन आकाशासारखे आहे. अंतःकरणात माया, ममता आहे, गर्वाचा लवलेशही नाही. त्यांनी सुरू केलेल्या इवल्याश्या सेवा कार्याचा आज वटवृक्ष झालेला दिसतो आहे.
- डॉ. जयंत गणेश करंदीकर.