अठरा वेद पुराणे, सोळा विद्या आणि चौसष्ट कलांनी संपन्न असणार्या आपल्या भारतभूमीला अतिशय समृद्ध अशी सांस्कृतिक इतिहासाची पार्श्वभूमी लाभली आहे. हा वारसा युवा पिढीने अंगिकारावा, पुढे न्यावा, आपल्या अंगभूत कलागुणांना, क्रीडा आणि सांस्कृतिक अभिरुचीला फुलवावे यासाठी बापू नेहेमीच प्रयत्नशील राहिले आहेत.
विविध कलागुणांच्या आविष्काराने समाजमनाची सांस्कृतिक उन्नती होत असते. विविध खेळांच्या माध्यमातून वैरभाव दूर ठेवून लढण्याची, स्वतःला आजमावून पाहण्याची संधी मिळते. अभिजात कलांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास होतो व त्यातूनच राष्ट्राचा विकास होण्यास योगदान मिळते. याच विचारातून तरुण तरुणींनी कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात पुढे यावे यासाठी लोकमंगल कला, क्रीडा, सांस्कृतिक व युवक मंडळाच्या माध्यमातून बापूंनी अनेक सांस्कृतिक व क्रीडा विषयक उपक्रम सुरू केले आहेत.
आपल्या समाजातील तरुण तरुणींची अष्टपैलू व्यक्तिमत्वे घडावीत या ध्येयाने प्रेरित होऊन या मंडळाची मुहुर्तमेढ रोवली गेली. शैक्षणिक क्षेत्राविषयी तळमळ असणार्या बापूंनी विद्याभ्यासाचे मोल जाणून अनेक शैक्षणिक उपक्रम तर राबविले आहेतच परंतु त्याचबरोबर युवा पिढीच्या कलागुणांना चालना मिळून त्यांची विविधांगी प्रगती व्हावी यासाठी या मंडळातर्फे नियमितपणे विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.
हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्र सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यामध्ये अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्राचे निरूपण संपन्न झाले. अहमदनगर येथील निरूपणकार श्री. आत्माराम शिंदे (एमबीए) यांनी आपल्या अमोघ वाणीने केलेल्या या सुश्राव्य निरुपणाने सर्व उपस्थित सोलापूरकरांची मने जिंकून घेतली.
हिंदू नव वर्ष सुरू होते चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्याच्या दिवशी. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा मंगल सण. या सुंदर दिवसाचे औचित्य साधून लोकमंगल प्रतिष्ठान तर्फे 'वारा गाई गाणी' या सुगम संगीताच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. 'नमन नटवरा' या संस्थेच्या कलाकारांनी या कार्यक्रमात सुमधुर गीते सादर केली. रात्री बारा वाजता बापूंच्या हस्ते गुढी उभारून अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत यावेळी करण्यात आले.
जिल्ह्यातील युवक - युवतींच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना एक उत्तम व्यासपीठ मिळावे यासाठी लोकमंगल प्रतिष्ठान व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले गेले. या महोत्सवामध्ये वक्तृत्व स्पर्धा, लोकनृत्य, लोकगीते, भरतनाट्यम, शास्त्रीय गायन व वादन अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर, अॅड. विजय खरे, अॅड. पन्नालाल सुराणा, प्रा. तानाजी ठोंबरे आदी मान्यवर विचारवंतांनी लोकमंगल प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून विचार व्यक्त केले.
पुरस्काराला जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व असते. माणसाच्या गुणवैशिष्ट्यांचा समाजाने केलेला सन्मान म्हणजे पुरस्कार. हे व्यक्तीचे समाजातील मानचिन्हच असते. बापूंनी लोकमंगल वाचनालयाच्या वतीने साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी साहित्य पुरस्कारांचे वितरण केले जाते. साहित्यिक आपल्या साहित्यातून विविध विचार, माहिती सर्वदूर पोहोचवत असतात. या पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांचा सन्मान केला जातो.